नागपूर : महाराष्ट्र विधानभवनाच्या लॉबीमध्येच हाणामारी करून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला गालबोट लावलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला असून ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्यावर कारागृह शिक्षेची शिफारस करण्यात आली आहे. लॉबीमध्येच हाणामारी झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची लक्तरे वेशीर टांगली गेली होती, त्यानंतर यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती.
पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधान भवनाच्या परिसरात घडलेल्या धक्कादायक हाणामारीने संतापालाची लाट पसरली होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली होती. गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनाच्या परिसरातच ङ्गमंगळसूत्र चोरफ अशी घोषणा दिली होती. नंतर शाब्दिक चकमकीचे रुपांतर थेट धक्काबुक्कीत आणि नंतर हाणामारीत झालं होतं.
हक्कभंग समितीकडून या घटनेची स्वतंत्र चौकशी
या संपूर्ण प्रकरणाची नोंद मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून करण्यात आली. विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीकडून या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू झाली. समितीचा तपशीलवार अहवाल आता पूर्ण झाला असून तो सभागृहात सादर केला जाणार असल्याचे समजते. तसेच या अहवालानंतर राज्य शासन कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंवर कारवाई केली होती.
तर आम्ही नक्की विरोध करू
दरम्यान, अहवालावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विधीमंडळात झालेल्या हाणामारी प्रकरणात हक्कभंग समिती जो अहवाल सादर करेल त्यात पक्षपातीपणा असल्यास आम्ही नक्कीच त्याचा विरोध करू. विनापास सताधारी आमदार मंत्री येणार असतील तर अध्यक्षांनी सर्व नियम शिथील करावेत. हे चुकीचं आहे सभागृहातही हा विषय येईल, अर्थपूर्ण कारणांसाठी कोण येतं, कोण नाही हे तुम्हालाही माहित आहे. सत्ता कोणाचीही असो हे ठराविक लोकं तुम्हाला दिसणारच. यावर संबधित यंत्रणेने योग्य ती कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेंनी दिली